ग्राहकांकडून अन्नधान्याला मागणी   

गहू, ज्वारी, बाजरीच्या दरात क्विंटलमागे १०० रूपयांनी वाढ 

पुणे : घाऊक आणि किरकोळ बाजारात ग्राहकांकडून विविध प्रकारच्या अन्नधान्याला मागणी वाढली आहे. अचानक मागणी वाढली असल्याने घाऊक बाजारात गहू, ज्वारी आणि बाजरीच्या दरात क्विटलमागे १०० रूपयांनी वाढ झाली आहे. अशी माहिती भुसार व्यापार्‍यांनी दिली. 
 
मार्केट यार्डातील भुसार बाजारात धान्याला मागणी वाढली आहे. किरकोळ बाजारात अन्नधान्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारातून शहर, तसेच परिसरातील किराणा माल विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अन्नधान्याच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. अन्नधान्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात येत आहे. गहू, ज्वारी आणि बाजरीला मागणी वाढल्याने दरात गेल्या दोन ते तीन दिवसात क्विंटलमागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे. बाजारात तांदळाची आवक चांगली होत असून, तांदळाचे दर स्थिर आहेत. साठवणुकीसाठी अन्नधान्य खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल वाढला आहे.
 
कडधान्य, चनाडाळ, बेसन, साखर, खाद्यतेल, तुपाच्या मागणीत वाढ झाली आहे. चना डाळ आणि बेसनाच्या दरात किलोमागे तीन रुपयांनी वाढ झाली आहे. मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजारात पुणे विभाग, तसेच दक्षिण भारतातून फळे, भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होते. 
 
उत्तरेकडील राज्यातून तुलनेने शेतीमालाची आवक कमी होते. पाकिस्तानातील अस्थिरतेमुळे जगभरातून गेल्या काही वर्षांपासून भारतीय बासमतीला तांदळाला मागणी वाढली आहे. गेल्या पाच वर्षांत भारतीय बासमतीची निर्यात ३० लाख टनांवरुन ६० लाख टनांवर पोहोचली आहे, असे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.
 
दरवर्षी उन्हाळ्यात साठवणुकीतील धान्याची खरेदी केली जाते. युद्धजन्य परिस्थितीमुळे मार्केट यार्डातील भुसार बाजारात किरकोळ ग्राहक, तसेच किराणा माल विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी वाढली असून, बाजारात अन्नधान्याच्या साठा मुबलक आहे. खाद्यतेल वगळता अन्य सर्व अन्नधान्याचे दर स्थिर आहेत.
 
- राजेंद्र बाठिया, माजी अध्यक्ष, दी पूना मर्चंट्स चेंबर
 
अफगाणिस्तानातील सुकामेव्याची आवक विस्कळीत
 
युद्धजन्य परिस्थितीमुळे सुकामेव्याच्या आयातीवर परिणाम झाला आाहे. सुकामेव्याचा साठा मुबलक आहे. अफगाणिस्तानातून आयात केला जाणार्‍या सुकामेव्याची वाहतूक पर्यायी मार्गाने केली जात आहे. सद्य:स्थितीत सुकामेव्याचे दर स्थिर आहेत, असे मार्केट यार्डातील व्यापारी नवीन गोयल यांनी सांगितले. अफगाणिस्तानातून बदाम, किशमिश, पिस्ता, अक्रोडची आयात केली जाते. तुर्कीतून अंजीर, तसेच खजूर आयात केला जातो. इराणमधून पिस्ता, खजूर, किशमिश, इराकमधून खजूर, तसेच पाकिस्तानातून खजूर, पिस्ता भारतात आयात केला जातो. अफगाणिस्तानातील सुकामेवा अटारी सीमेवरुन भारतात पाठविला जातो.

Related Articles